Vedshastrottejak Sabha, Pune

स्थापना - मंगळवार, दिनांक ३१ ऑगस्ट, १८७५ (भाद्रपद शु. प्रतिपदा, शके १७९७)

Vedshastrottejak Sabha, Pune

वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे

शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२४-२५

प्राचीन भारतीय वेदविद्या आणि शास्त्रविद्या भारतीय संस्कृतीतील उज्वल ज्ञानपरंपरेच्या द्योतक आहेत. ज्ञाननिष्ठा, स्मरणशक्ती, अथक परिश्रम आणि चिकाटी या चतुःसूत्रीच्या आधारावर शतकानुशतके विद्वानांनी या विद्यांचे संरक्षण आणि संवर्धन केले. परंतु इंग्रजी राजवटीच्या काळात या विद्यांना मिळालेला राजाश्रय नष्ट झाला. इंग्रजांच्या प्रभावामुळे लोकांचा कल हळूहळू इंग्रजी भाषेकडे वळू लागला प्राचीन भारतीय वेदविद्या आणि शास्त्रविद्या यांचे अध्ययन करणाऱ्यांची संख्या कमी होऊ लागली.

संस्थेचे संस्थापक

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

रा. सा. महादेव मोरेश्वर कुंटे

रा. ब. सी. वि. पटवर्धन

श्री. धों. मो. साठे

या सर्व परिस्थिती विषयी गांभीर्याने विचार करणारे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि कविवर्य महादेव मोरेश्वर कुंटे यांच्या पुढाकाराने पुण्यातील तत्कालीन प्रतिष्ठित वैदिक विद्वान आणि शास्त्री यांची एक सभा बोलावली गेली.

सदर सभेत या सर्व गोष्टींवर विचार होऊन प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेच्या रक्षणासाठी एका संस्थेची स्थापना केली गेली. ती संस्था म्हणजे वेदशास्त्रोत्तेजक सभा. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध प्रतिपदा, शके १७९७ म्हणजे दिनांक ३१ ऑगस्ट १८७५.

ध्येय

वेद आणि शास्त्रांशी संबंधित ज्ञानसंपदेच्या संरक्षण व संवर्धनासाठी  जागतिक पातळीवरची एक संस्था.

उद्दिष्टे

  • वेदसभेला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे.
  • परीक्षासंबंधित कार्याची व्याप्ती भारतातील सर्व मुख्य वेदपाठशाळांपर्यंत नेणे.
  • वेद आणि शास्त्रांसंबंधी वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करण्याला प्रोत्साहन देणे.  
  • वेद आणि शास्त्रांसंबंधी मूलभूत अभ्यासक्रम तयार करणे. 
  • वेद आणि शास्त्रांवरील हस्तलिखिते आणि प्रत्येक प्रकाशित पुस्तक असणारे सुसज्ज ग्रंथालय तयार करणे. 

विद्या ददाति विनयं विनयाद्याति पात्रता । पात्रत्वाद्धनमाप्नोति धनाद्धर्मं ततः सुखम् ॥

इंग्रजी राजवटीच्या काळात लोप पावत चाललेल्या प्राचीन भारतीय वेद व शास्त्रे यांच्या अध्ययन व अध्यापन परंपरेचे संरक्षण आणि संवर्धन करणे या उद्देशाने वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे या संस्थेची स्थापना झाली. स्थापना वर्षापासून परीक्षा घेण्यास प्रारंभ झाला. त्यासाठी सभेचा अभ्यासक्रम विद्वानांनी तयार केला. परीक्षा मंडळाची स्थापना करून परीक्षांचे पूर्णत: नियोजन करण्याचे कार्य या मंडळाकडे सोपविले गेले. परीक्षा मंडळाचे सदस्य म्हणून अनेक दिग्गज विद्वानांनी काम केले आहे.

सभेच्या अभिज्ञ, कोविद आणि चूडामणि या तीन परीक्षा असून त्यांना क्रमश: बारावी, बी.ए., आणि एम्.ए. अशी समकक्षता आहे. ही समकक्षता राष्ट्रीय संस्कृत संस्थानने परीक्षांचा दर्जा बघून १३ जानेवारी १९९२ या दिवशी सभेला दिली आहे. सदर समकक्षता मिळविणारी सभा ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे. तसेच दक्षिणाम्नाय श्री शृंगेरी शारदा पीठ व श्री तिरुमला तिरुपति देवस्थाननेही या परीक्षांना मान्यता दिली आहे.