Vedshastrottejak Sabha, Pune

स्थापना - मंगळवार, दिनांक ३१ ऑगस्ट, १८७५ (भाद्रपद शु. प्रतिपदा, शके १७९७)

Vedshastrottejak Sabha, Pune

वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे

शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२४-२५

वाटचाल शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाकडे

प्राचीन भारतीय विद्यांची अध्ययनपरंपरा जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक ३१ ऑगस्ट १८७५ या दिवशी न्या. महादेव गोविंद रानडे व त्यांचे मित्र कविवर्य महादेव मोरेश्वर कुंटे यांनी वैदिक, शास्त्री, पंडित व इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने वेदशास्त्रोत्तेजक सभेची स्थापना केली. इंग्रजी राजवटीच्या काळात वेदशास्त्रादि विद्यांच्या अध्ययनाकडे समाजाचे दुर्लक्ष होऊ लागले आणि लोक आंग्लविद्येच्या अध्ययनाकडे वळू लागले. त्यामुळे भविष्यकाळात या विद्यांची अध्ययनपरंपरा प्रायश: नष्ट होईल की काय अशी भीती वाटू लागली. हे ध्यानात घेऊनच या प्राचीन विद्यांच्या अध्ययन अध्यापनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने या संस्थेची स्थापना करण्यात आली. संस्थेच्या उद्देशानुसार प्राचीनतम वेदविद्या व भारतीय शास्त्रे यांच्या अध्ययनास उत्तेजन देण्याचे, त्यांच्या परीक्षा घेण्याचे कार्य सुरू झाले. त्यास अनुसरून सभेची घटना तयार करणे, घटनेची सरकार दरबारी नोंद करणे, अभ्यासक्रमाची आखणी करणे, परीक्षा मंडळाची नियुक्ती करणे, प्रतिवर्षी विविध विषयांच्या परीक्षा घेणे ही कामे सुरू झाली.

परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना दरवर्षी पदवी, पारितोषिके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतात. तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना एक वेळचा प्रवास खर्च देण्यात येतो. वेदविद्येचे अध्ययन करणार्‍या होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती घेताना सभेची परीक्षा विद्यार्थ्याने दरवर्षी देणे अभिप्रेत आहे. वेदविद्या ही गुरुमुखी विद्या असल्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या अध्यापकांनाही अध्यापक मानधन देण्यात येते. सभेच्या अभिज्ञ, कोविद व चूडामणी या तीन परीक्षांना भारत शासनाने अनुक्रमे १२ वी, बी.ए., एम्.ए. अशी समकक्षता दिली आहे. या परीक्षा पुणे व विविध केंद्रांवर घेण्यात येतात. या परीक्षांना सुमारे ८०० विद्यार्थी दरवर्षी बसतात. विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी वृद्धिंगत होत आहे. परीक्षेच्या पदवीदान समारंभात एक ज्येष्ठ वैदिक विद्वान व एक ज्येष्ठ संस्कृत विद्वान यांचा सन्मान करण्यात येतो.

वेदविद्येची पठण परंपरा लुप्त होत असल्याने काळाच्या ओघात अनेक वेदशाखा नष्ट होऊ लागल्या. एकदा नष्ट झालेली पठण परंपरा पुनरुज्जीवित करणे कदापिही शक्य नाही त्यामुळे उपलब्ध वेदशाखांच्या ध्वनिमुद्रणाचा प्रकल्प संस्थेने हाती घेतला. या प्रकल्पांतर्गत आज सभेकडे आठ वेदशाखांचे ध्वनिमुद्रण असून त्यापैकी ऋग्वेदाच्या संहितेच्या दृक्श्राव्य ध्वनिमुद्रण प्रकल्पाचे काम सध्या सुरू असून ते लवकरच पूर्णत्वास जाईल.

संस्थेचे एक ग्रंथालय असून त्या ग्रंथालयात सहा हजार छापील पुस्तके आहेत. तसेच हस्तलिखित ग्रंथांचा वेगळा संग्रह असून त्यात चार हजार हस्तलिखिते समाविष्ट आहेत. या हस्तलिखितांच्या सूचीचे काम लवकरच पूर्ण केले जाईल. सन २०१५ यावर्षी सभेने प्राचीन श्रौत यज्ञात वापरल्या जाणार्‍या यज्ञीय पात्रांची एक प्रदर्शनी सिद्ध केली असून त्यात सुमारे १२० यज्ञीय पात्रे समाविष्ट केली आहेत. आजच्या पिढीला प्राचीन यज्ञ धर्माचे ज्ञान व्हावे यासाठी विविध ठिकाणी हे प्रदर्शन भरविण्यात येते. या प्रदर्शनीला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो.

प्रकाशने – हे सर्व कार्य चालू असतानाच संस्थेने प्राचीन भारतीय वेद व शास्त्र विद्या यांचा परिचय करून देणारे तीन ग्रंथ मराठी भाषेतून प्रकाशित केले आहेत. त्याशिवाय नित्य कर्मास उपयोगी असे ऋग्वेदीय व हिरण्यकेशीय नित्यविधी ही दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. तसेच सर्वसामान्यांना वेदाचा परिचय व्हावा यासाठी वेदपरिचय, अर्थासहित रुद्रपठण असणारी सार्थ रुद्राध्याय, जटाघन इत्यादी विकृतिपाठांच्या परिचयात्मक अशी ईशावास्योपनिषद (विकृतिपाठासह) या सी.डी. संस्थेने प्रकाशित केल्या आहेत. तसेच संस्कृत भाषेचे जिज्ञासुंसाठी सभेच्या वतीने ’मेघदूत’ वाचनवर्ग घेण्यात आला. त्यास जिज्ञासुंचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून यापुढेही संस्कृत भाषेतील विविध काव्य, नाटक इत्यादी ग्रंथांचा रसास्वाद या वर्गांच्या माध्यमातून जिज्ञासूंना मिळणार आहे. तसेच काळाची गरज लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातून एक दिवस संस्कारवर्गही सभेत घेण्यात येतो. या वर्गात अनेक स्तोत्रे, बुद्धीवर्धक खेळ इत्यादी शिकविले जातात.

अध्यक्षीय संदेश

वेदविद्या आणि शास्त्रविद्या या दोन्ही विद्या म्हणजे प्राचीन भारतीय समृद्ध ज्ञानपरंपरेच्या निदर्शक आहेत. हजारो वर्षे हा वैचारिक ठेवा गुरुशिष्यपरंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत गेला. परंतु दुर्दैवाने ब्रिटिश राजवटीत इंग्रजी शिक्षणाच्या प्रभावाने आणि या विद्यांचा राजाश्रय नष्ट झाल्यामुळे या विद्या लुप्त होतील का अशी भीती न्या. म. गो . रानडे प्रभृतींना वाटू लागली. या समस्येवर विचारविनिमय होऊन वेदसभेची स्थापना झाली. दि . ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सभा १५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे संस्थेच्या वाटचालीत हाएक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
पाठशाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे, वेदांचे ध्वनिमुद्रण, ग्रंथप्रकाशन, अध्यापन वर्ग इ. कार्ये सभा करीत आहे. तथापि आज सामान्यांना वेद व शास्त्रे यांबद्दल फारशी माहिती नाही. त्यामुळे १५० व्या वर्षात पदार्पण करीत असताना हे मौलिक ज्ञान समाजापर्यंत कसे जाईल याचा प्रयत्न सभा करणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार हे प्राचीन भारतीय ज्ञान विद्यार्थ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने देखील सभा उचित असा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात आणि तत्पश्चातही सभा वेदांच्या आणि शास्त्रांच्या अध्ययन – अध्यापनपरंपरेचे संरक्षण व संवर्धन करण्याचा सर्वतोपरि प्रयत्न करेल, अशी मी सभेचा अध्यक्ष म्हणून ग्वाही देतो.

- डॉ. दीपक टिळक